in

‘विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न केला, तर शिवसैनिक जिथल्या तिथे हिशोब करतात’

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा राजकीय पक्ष असलेला शिवसेना आज ५५वा वर्धापन दिन साजरा करत आहे. वर्धापन दिनानिमित्त आतापर्यंतच्या वाटचालीवर प्रकाश टाकत शिवसेनेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं कौतुक करत भाजपा आणि केंद्रातील सरकारवर निशाणा साधला आहे. “गंगेत तरंगणारी प्रेते, गुजरातेत स्मशानाबाहेरील अॅम्ब्युलन्सच्या रांगा, सामुदायिक चिता यांचे फोटो जगभरात गेले. देशाची प्रचंड मानहानी झाली. पण या बदनामीच्या चक्रातून महाराष्ट्र लांब राहिला. तो फक्त महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री दमदारपणे कर्तव्य बजावत असल्यामुळेच,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपा आणि मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

वर्धापन दिनानिमित्त सामना अग्रलेखातून पक्षाच्या आजपर्यंतच्या वाटचालीवर आणि देशातील सध्या राजकीय व सामाजिक स्थितीवर शिवसेनेनं भाष्य केलं आहे. “शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन म्हणजे उत्साह, बुलंद गर्जना आणि प्रचंड गर्दी असा एकंदरीत थाटमाट असतो. पण ‘करोना’ महामारीने या सगळ्यांवर सलग दुसऱ्या वर्षीही पाणी ओतले आहे. संपूर्ण देशाचीच स्थिती करोनामुळे गंभीर, तितकीच नाजुक बनली आहे. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात आज फक्त निराशा किंवा वैफल्यच दिसत आहे. उद्योग क्षेत्राला फटका बसल्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात रोजगार गमावला आहे. नोकऱ्याच गेल्याने त्याचा परिणाम शेवटी कष्टकऱ्यांच्या ‘चुली’वर झाला. लोकांच्या चुली विझताना दिसत आहेत. शिवसेनेने स्थापनेपासून लोकांच्या चुली पेटविण्याचा महायज्ञच आरंभला होता. शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठी माणसाला महाराष्ट्राच्या राजधानीत हक्काची रोजीरोटी मिळावी, त्याला सन्मानाने जगता यावे यासाठीच झाली,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“गेल्या दीड वर्षात लोकांनी गमावलेल्या नोकऱ्या हाच चिंतेचा आणि संकटाचा विषय बनला आहे. देशाचा व राज्यांचा खजिना फक्त करोनाशी लढण्यातच खर्ची पडला आहे. महाराष्ट्राने अनेक संकटे छाताडावर घेतली. अनेक लढाया पचवल्या. राजकीय, सामाजिक लढ्यांत असंख्य बलिदानेही दिली, पण करोनाची पहिली लाट, मग दुसरी लाट, आता म्हणे तिसरी लाटही दारावर धडका देत आहे. या लाटांनी आम्ही सगळ्यांनीच आपले आप्तस्वकीय, मित्रपरिवारांतले जवळचे लोक गमावले. त्या सगळ्या संकटांवर आणि मृत्यूच्या तांडवावर महाराष्ट्राने जितक्या लवकर नियंत्रण मिळवले तेवढे ना केंद्राला जमले, ना इतर राज्यांना करता आले. गंगेत तरंगणारी प्रेते, गुजरातेत स्मशानाबाहेरील अॅम्ब्युलन्सच्या रांगा, सामुदायिक चिता यांचे फोटो जगभरात गेले. देशाची प्रचंड मानहानी झाली. पण या बदनामीच्या चक्रातून महाराष्ट्र लांब राहिला. तो फक्त महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री दमदारपणे कर्तव्य बजावत असल्यामुळेच,” असा दावा शिवसेनेनं केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आजपासून ३० ते ४४ वयोगटाचं लसीकरण

मिल्खा सिंग यांच्या निधनानं फरहान अख्तर भावूक; म्हणाला…