राज्यात आज 8 हजार 702 तर मुंबईत 1 हजार 145 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाची परीस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यातच प्रशासन राज्यातील शाळा सुरु करण्यावर विचार विनिमय करत आहे.
राज्यात जिल्ह्यातील शाळेत असंख्य विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. दक्षिण सोलापूरच्या अंत्रोळी येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत 43 जणांना कोरोना, साताऱ्यात 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. या 16 शाळातील 35 विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचं समोर आले. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील देगावच्या एका आदिवासी हॉस्टेलमधील 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. लातूरात खासगी हॉस्टेलमधील 45 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे सुरु केलेल्या शाळा बंद करायच्या का असा सवाल आता उपस्थित होत आहे.
दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रकार पाहता व जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता १ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा. असे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
तसेच विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देत, ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे; तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.
Comments
Loading…