देशात मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होत असताना, काँग्रेसच्या काळात इंधन दरवाढ झाल्यावर ट्विट करणारे सिनेकलाकार आता काहीच का बोलत नाहीत. या विरोधात आक्रमक होऊन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. ते भंडारा येथे बोलत होते.
या आशयाचे ट्विट देखील पटोले यांनी केले आहे. यामध्ये ते म्हणाले की, पेट्रोल, डिझेल दरवाढीने नागरिक त्रस्त झाले आहेत. काँग्रेसच्या सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार टि्वटरच्या माध्यमातून टीका करायचे. आता मात्र आता त्यांना ट्विटचा विसर पडला आहे. जर त्यांनी भूमिका नाही मांडली तर त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग बंद पाडू, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
या संदर्भात भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार विरोध करत , महाराष्ट्रात आणीबाणी लागू करणार आहे का? असा सवाल नाना पटोले यांना केला आहे. सत्ता तुमची असली तरी तुमची मनमानी चालणार नाही. देश घटनेच्या चौकटीत आणि कायद्यानुसार चालतो, तुमच्या मर्जीवर नाही. राज्य कायद्याचे आहे पप्पा किंवा पप्पूचे नाही. अशा आशयाचे ट्विट केले आहे.
Comments
Loading…