लोकशाही न्यूज नेटवर्क
वर्गखोलीची भिंत कोसळल्यामुळे 5 ते 6 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लोहारा येथील स्व. रतिराम टेंभरे हायस्कूल खासगी शाळेत घडली आहे. दरम्यान, हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असला तरी जखमी विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल केल्याने हे बिंग फुटले आहे.
रतिराम टेंभरे शाळेत पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरतात. वर्ग सुरू असताना अचानक भिंत कोसळली. यात ५ ते ६ विद्यार्थी जखमी झाले. डॉक्टरांना शाळेतच बोलावून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत सयुरी नेवारे (13), सोनाली शिवरकर (13) जखमी झाल्या आहेत, तर उमाशंकर सपाटे याला गंभीर इजा झाली आहे. त्याला उपचारासाठी तुमसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतर विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. अनेक दिवसांपासून ही भिंत जीर्णावस्थेत होती. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे, असा आरोप पालकांकडून केला जात आहे.
दरम्यान, घटनेला ३ दिवस उलटल्यानंतरही शाळा प्रशासनानं याप्रकरणी जिल्हा प्रशासनाला कुठलीही कल्पना दिली नाही. विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. सर्व अहवाल तयार करून शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवला आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तुमसर यांनी दिली आहे.
Comments
Loading…