in ,

…तालिबानशी तुलना आम्हाला मान्य नाही; शिवसेनेनं जावेद अख्तर यांना सुनावलं

ज्येष्ठ कवी लेखक जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मागील काही दिवसांपासून वाद निर्माण झालेला असतानाच आता शिवसेनेने या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे हे योग्य नाहीच, ते आम्हाला मान्यही नाही, अशी आक्रमक भूमिका घेत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जावेद अख्तर यांना सुनावलं आहे.

“सध्या आपल्या देशात कोणीही कोणाला तालिबानी म्हणत आहे. कारण अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट म्हणजे समाज व मानवजातीला सगळय़ात मोठा धोका आहे. पाकिस्तान, चीनसारख्या राष्ट्रांनी तालिबानी राजवटीचे समर्थन केले; कारण या दोन्ही देशांत मानवी हक्क, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य यांचे काहीच मूल्य राहिलेले नाही.

भारताची मानसिकता तशी दिसत नाही. एकतर आपण कमालीचे सहिष्णू आहोत. लोकशाहीच्या बुरख्याआड काही लोक दडपशाही आणू पाहत असले तरी त्यांना मर्यादा आहेत. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणं हे योग्य नाहीच, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय.

देशात जेव्हा जेव्हा धर्मांध, राष्ट्रद्रोही विकृती उसळून आल्या त्या प्रत्येक वेळी जावेद अख्तर यांनी त्या धर्मांधांचे मुखवटे फाडले आहेत. धर्मांधांची पर्वा न करता त्यांनी ‘वंदे मातरम्’चे गान केलं आहे. तरीही संघाची तालिबानशी केलेली तुलना आम्हाला मान्य नाही. संघ आणि तालिबानसारख्या संघटनांच्या ध्येयामध्ये कोणताही फरक नसल्याचं त्यांचं म्हणणं सर्वस्वी चूक आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची आरास

मोठी बातमी : अनिल देशमुखांविरोधात लुकआउट नोटीस जारी