in

वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू; ताडोबात व्याघ्र प्रगणना कार्यक्रम सुरू असताना हल्ला

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात अखिल भारतीय व्याघ्र प्रगणना कार्यक्रमांतर्गत प्राण्यांच्या पाऊल खुणा नोंदविण्याच्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या दिवशीच महिला वनरक्षकावर वाघिणीने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना कोलारा येथील कोअर झोनच्या कक्ष क्रमांक ९७ मध्ये शनिवारी घडली. स्वाती एन. ढुमणे (४३) असे मृत महिला वनरक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे व्याघ्र प्रगणना कार्यक्रमाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

स्वाती ढुमणे यांनी कोलारा बीट येथे ३ सहायकांसह सकाळी ७ च्या सुमारास मांसभक्षी व मोठ्या तृणभक्षी प्राण्यांच्या पाऊलखुणांचे सर्वेक्षण सुरू केले होते. कोलारा गेटपासून कंपार्टमेंट क्रमांक ९७ पर्यंत सुमारे ४ कि.मी. पायी चालत गेल्यावर त्यांना सुमारे २०० मीटर अंतरावर एक वाघीण बसलेली दिसली. त्यांनी सुमारे अर्धा तास वाट पाहिली आणि घनदाट जंगलातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, याच दरम्यान वाघिणीने स्वाती यांच्यावर हल्ला केला.

सर्व सहकारी सैरावैरा पळाले. घटनेची माहिती मिळताच ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर, ताडोबा कोरचे उपवनसंरक्षक नंदकिशोर काळे घटनास्थळी दाखल झाले.

वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह तात्काळ शोधून शवविच्छेदनासाठी चिमूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. पाऊलखुणांचे सर्वेक्षण पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जोवर वनरक्षक व वनपाल यांना सर्वेक्षणाकरिता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात नाही तोपर्यंत त्यांना सर्वेक्षणासाठी बाध्य करू नये, अन्यथा कर्मचाऱ्यांच्या प्राणास धोका झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा वनरक्षक व वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी दिला आहे. राज्याच्या वन्यजीव विभागाने या घटनेची अतिशय गंभीर दखल घेतली आहे.

विशेष व्याघ्र कृती दल कुठे होते?

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र कृती दल कार्यरत आहे.व्याघ्र गणना कार्यक्रमाची सुरुवात होत असताना हे दल नेमके कुठे गेले होते, अशी विचारणा आता होऊ लागली आहे. वन खात्यात २००५ नंतर महिला वनरक्षक भरतीची सुरुवात झाली. परंतु त्यांना स्वसंरक्षणार्थ आवश्यक प्रशिक्षण देण्यात येते का, असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पतीला तात्पुरती नोकरी, मुलीला मदत

स्वाती ढुमणे यांच्या पतीला तात्पुरती नोकरी देण्याचा निर्णय वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी जाहीर केला आहे. तसेच चार वर्षाच्या मुलीसाठी राज्य सरकार तथा विविध संस्थांच्या वतीने आर्थिक योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ताडोबा फाऊंडेशनकडून पाच लाखांचा धनादेश व ताडोबा संवर्धन प्रतिष्ठानकडून ५० हजारांची मदत देण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Cash Flew : पैशांचा पाऊस पडला तर काय होईल?

भाजपच्या विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून नियुक्ती