शेतकरी नेते राकेश टिकैत यांची यवतमाळमधील प्रस्तावित महापंचायत आता रद्द करण्यात आली आहे. दोनवेळा टिकैत यांच्या महापंचायतीला परवानगी नाकारली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विदर्भ दौरा रद्द झाल्याचं त्यांनी सांगितलं. विदर्भातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारली असल्याचं समजतं.
दिल्लीच्या सीमांवर गेल्या अनेक दिवसांपासून कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत जनजागृती आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरात महापंचायतींचं आयोजन करण्यात आलं आहे. याच धर्तीवर यवतमाळमध्ये महापंचायत आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला किसान युनियनचे नेते राकेश टिकैत उपस्थित राहणार होते. मात्र, आता कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे.
महाराष्ट्रात विशेषत: विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. अनेक जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यवतमाळमध्येही संचारबंदी लागू असून सभा, बैठका आणि सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही. तसंच यवतमाळमधील शाळा आणि महाविद्यालयं दहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
Comments
Loading…