लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या जव्हार भागातील रुग्णालयाची पाहणी केली. जामसर येथील बाल उपचार केंद्र, कॉटेज हॉस्पिटल, खरवंद अंगणवाडी तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची देखील पाहणी केली.
या भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त असून बालमृत्यूची समस्या गंभीर आहे, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. हा माझा पहिला दौरा असून तो धावता दौरा आहे. यापुढे मी जव्हारला भेट देईन. या भागात कुपोषणामुळे होणारी कोवळी पानगळ थांबवण्याचे आव्हान आहे. कुपोषण कमी करायचे आहे. आदिवासी संस्कृतीची जपणूक करून विकास साधायचा आहे.
कुपोषणाची समस्या सोडवायची आहे.
पालघर जिल्हा नवीन निर्माण झाल्याने येथे सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, हे शासनाचे काम आहे. कुपोषणाची समस्या कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच जव्हार हिल स्थानक आहे. येथे पर्यटन विकास करून यातूनही कुपोषणाची समस्या सोडवायची आहे. त्याचबरोबर आदिवासी समाजाची संस्कृती जपून येथील विकास साधायचा आहे. त्याचबरोबर येथील पाण्याचा प्रश्न, पर्यटन विकास करायचा आहे. जेणे करून येथील समस्या सुटतील.
राज्यपालांचे विमान प्रकरण काय?
काल (गुरुवारी) 11 फेब्रुवारीला राज्यपाल यांना उत्तराखंड येथे कार्यक्रमानिम्मित जायचे होते. मात्र, त्यांच्या विमान प्रवासाला राज्यसरकारकडून नकार कळवण्यात आला. त्यामुळे राज्यपालांना विमानातून खाली उतरण्याची नामुष्की आली. त्यानंतर राजकीय बराच वादही पेटला. त्यामुळे आज राजभवनावर जाऊन तेथील हेलिपॅड वापरणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळले.
साधुंची हत्या केलेल्या ठिकाणाला भेट नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज पालघर दौरा होता. आमची अपेक्षा होती की, ज्या ठिकाणी आमचे दोन हिंदू साधुंना ठेचून मारले त्या ठिकाणी जाऊन ते या साधूंना आदरांजली वाहतील किंवा पत्रकार परिषदेत या घटनेचा तपास कशा पद्धतीने सुरू आहे, याची माहिती देतील. पण, राज्यपालांच्या नजरेला नजर भिडवता येऊ नये म्हणून रेसकोर्सवरून उड्डाण करणारे मुख्यमंत्री हिंदुत्व सोडल्याच्या भावनेतूनच हिंदू समाजाला काय तोंड दाखवणार म्हणून ना घटनास्थळी गेले ना साधु-संतांविषयी चकार शब्द काढला, असे भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले.
Comments
Loading…