लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाला आता नवीनच वळण लागलं आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पुणे पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात आलेली कारवाई ही खोट्या पुराव्यांच्या आधारावर झाल्याची धक्कादायक माहिती नव्या फॉरेन्सिक अहवालातून समोर आली आहे. रोना विल्सन, गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडेंसह अनेक मानवाधिकार कार्यकर्ते आणि बुद्धिजीवींना अटक करण्यात आली होती. या व्यक्तींविरोधात पोलिसांनी सादर केलेले पुरावेच बनावट होते, असा खळबळजनक खुलासा ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्रानं केला आहे. ‘आर्सेनल कन्सल्टिंग’ या अमेरिकेतील डिजिटल फॉरेन्सिक कंपनीकडील कागदपत्रं वॉशिंग्टन पोस्टच्या हाती लागल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.
रोना विल्सनसह एल्गार परिषदेशी संबंधित व्यक्तींच्या लॅपटॉपमधील पत्र डेटा पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यात आला होता. याच पुराव्यांच्या आधारावर मानवाधिकार कार्यकर्त्यांनी माओवाद्यांच्या मदतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.
पुणे पोलीस आणि राष्ट्रीय तपास संस्थेनं अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांनी अटक केली. यातील कथित आरोप तुरुंगावास भोगत आहेत. मात्र, ज्या पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली होती ते सर्व पुरावे बनावट आणि खोटे होते, असे सत्य आता समोर आले आहे. आर्सेनलच्या फॉरेन्सिक अहवालाची पडताळणी संगणक तज्ज्ञांकडून केली असल्याचा दावा वॉशिंग्टन पोस्टनं केला आहे. अनेकांची करण्यात आलेली अटक हे खोट्या पुराव्यांच्या आधारावर होती, असंही वृत्तपत्रानं म्हटलं आहे.
Comments
Loading…